अनेकदा अपक्ष म्हणून निवडून येणारे माजी राज्य मंत्री प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्याबाबत पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे.
अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेत बच्चू कडू यांना मोठा दणका दिला आहे. न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला.
याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसंच, पुढील पाच वर्षाकरीता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना बजावण्यात आली होती. 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे नोटिसीत नमूद करण्यात आले होतं.
एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका
2017 साली नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. बच्चू कडू यांना पंधरा दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. अशातच आता या प्रकरणाचा दाखला देत न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.