जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने, आता सरकारकडून देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असून, आज पुन्हा एकदा सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला येत आहे. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. सोबतच, बच्चू कडू देखील उपस्थित राहणार आहे.
विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवाली सराटी गावातून पायी दिंडी काढणार आहे. त्यांच्या याच आंदोलनामुळे सरकारची अडचण वाढू शकते.
त्यामुळे, सरकारकडून 20 जानेवारीला सुरु होणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. काल बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेऊन, अनेक मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी काही दुरूस्ती करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आज सरकारच एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे आजच्या या भेटीत काही मार्ग निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
राजू शेट्टी जरांगेंच्या भेटीला...
दरम्यान मनोज जरांगे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची देखील सोमवारी भेट झाली आहे. दोघांमध्ये आंतरवाली सराटीमध्ये भेट झाली असून, यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा देखील झाली. राजू शेट्टी सोमवारपासून जालना दौऱ्यावर असून, आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत येथे दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभाव बरोबरच मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यापूर्वी शेट्टी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा: शेट्टी
या भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया आली आहे. "इथं अंत बघू नका आणि विषाची परीक्षा घेऊ नका. ही आग आहे, हात घालायला गेलात तर हात भाजल्याशिवाय राहणार नाही, असा सरकारला शेट्टी यांनी इशारा दिला आहे. तसेच, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांमधील एक मोठा घटक मराठा समाज असून, शेतकऱ्यांचा नेता म्हणून मी त्यांच्याबरोबर राहणार असून, हे माझं कर्तव्य आहे. 20 तारखेच्या मुंबई आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, या आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं आवाहन देखील शेट्टी यांनी केले आहे.