मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात ठाण मांडलं आहे. आझाद मैदानात मोठ्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर मुक्काम ठोकला आहे. सीएसएमटी परिसरात थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचं कोर्टाच्या निर्दशनास आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांच्या पार्किंगमधील गाड्यादेखील पोलिसांनी हटवल्या आहेत.
मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करून न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या विनंतीमुळे ऑरेंज गेट, वाडी बंदर, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग, बी पी टी रोड परिसर मोकळा होण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता हळूहळू आंदोलक येथून निघत आहेत. मुंबई पोर्टमध्ये जाणारी माल वाहतूक, बीपीएचपी कंपनीत जाणारी टँकर वाहतूक सुरू झाली आहे. तसेच खासगी वाहतूक देखील पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळत आहे.