बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. संतोष देशमुख यांच कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
डाग लागून घेऊ नका, लेकरांना न्याय द्या. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुखांच्या लेकरांनी कोणाकडे पाहायचं. आज त्यांना त्यांचा बाप दिसत नाही. राज्य चालवत आहात, पालकत्व तुमच्याकडे आहे. लेकरं उघड्यावर पडली आहेत. आरोपी पकडणे, कोणाचे निलंबन करणे या अतिशय साध्या मागण्या आहेत. मराठे आहेत म्हणून न्याय देणार नसाल तर ही मुख्यमंत्र्यांची राज्य चालवण्याची चुकीची पद्धत आहे.
आरोपी फरार आहेत याविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आरोपीला जात नसते.मारेकरी हा मारेकरीच आहे. त्याला डांबलेच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. त्याला जातीचा संबंध नाही. आम्ही जात लावत नाही तुम्ही जात लावू नका. या मताचे आम्ही येत आहे. सरकारने वेळीच ही परिस्थिती हातळली पाहिजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. कुटुंबाकडून सीआयडी चौकशीची मागणी केली जात आहे. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सकाळपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे.. सर्वजण संयम पाळत आहेत परंतु जो प्रकार झालाय तो निंदनीय आहे.. यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत सर्व समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे.