मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने संघर्ष करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला. मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वाचेच लक्ष लागून होते. आज शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण यासोबतच आणखी मुद्दे मांडले. मात्र भाषणादरम्यान ते असं काही बोलले की उपस्थित सर्वाचेच डोळे पाणावले.

आरोग्याच्या अनिश्चिततेबद्दल बोलताना ते अत्यंत भावुक झाले. ‘शरीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा, एक पाच सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं, मी थोड्याच दिवसाचा पाव्हणा आहे, असे सांगत त्यांनी मराठा समाजाला आता मागे न हटण्याचे कळकळीचे आवाहन केले. त्यांच्या गरीब लेकरांच्या कल्याणाची चिंता व्यक्त करत, आपण हयात असेपर्यंत मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळाल्याचे पाहायचे आहे, अशी तीव्र इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत.
आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सर्वच जणांनी या पवित्र नारायण गडाच्या कुशीत येऊन मोठेपण सिद्ध केलं. मला बोलताना खूप त्रास होत आहे. आपला गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतेय. मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी असेही त्यांनी म्हटलं आहे.