मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक मराठवाड्यामध्ये तापला असतानाच आणि मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये किती फटका देणार याची चर्चा रंगली असतानाच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला हात घालत हे शक्य नसल्याचं पुन्हा एकदा सांगितले.
लातूरमध्ये आज राज ठाकरे यांची मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी रेनापुरात बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांसह निविरोधकांसह हल्लाबोल केला.
मग आजपर्यंत आरक्षण का मिळालं नाही? यांना कोणी अडवलं?
राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने इतिहास सांगताना म्हणाले की, मुंबईमध्ये 1999 मध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी मोर्चा आला होता. या मोर्चामध्ये कोण कोण होतं हे मला आजही आठवतं. त्यावेळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होते. व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेची लोकं गेली होती. या सर्वांनी मराठा आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. मग आजपर्यंत आरक्षण का मिळालं नाही? यांना कोणी अडवलं? अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की एकाचवेळी चौघांनी आरक्षण देणार सांगितले होते,तर ते का दिले गेले नाही? या सर्व घडामोडींना वीस पंचवीस वर्ष झाली आहेत, आतापर्यंत यांनी फक्त झुलवण्याचं काम केलं असल्याचं आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.
तुमच्या हातात तरी आहे का?
मुंबईमध्ये मोर्चा आल्यानंतर शिंदे यांनी सांगितलं जा, दिलं आरक्षण तुमच्या हातात तरी आहे का? राज्याच्या हातात तरी आहे का अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी फटकारले.
तमिळनाडूमध्ये आरक्षण दिले गेलं, पण तो विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून त्यावरती कोणताही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. जी गोष्ट घडू शकत नाही त्यासाठी आपण भांडत आहोत.
शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याकडे लक्ष नाही. तरुण शेतीकडे वळत नाहीत, कृषी विद्यापीठे थंडगार पडली आहेत. आत्महत्यांवर अभ्यास होत नाही. महिला तरुणींचे प्रश्न आहेत. महिलांना पळवून नेण्याचे सर्वाधिक प्रमाण मराठवाड्यामध्ये आहे, असा महाराष्ट्र कधीच नव्हता, अशी खंत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
दरम्यान राज ठाकरे म्हणाले की जिल्हा जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले. अत्यंत शिस्तबद्ध निघालेले मोर्चे मी महाराष्ट्राचे इतिहासामध्ये असे कधीच पाहिले नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मात्र त्या मोर्चाचं काय झालं? का आरक्षण मिळालं नाही अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसले. आता पहिल्यांदा निवडणूक लढवणार म्हणाले, त्यानंतर आता पाडणार म्हणत आहेत. मात्र आरक्षण कसे देणार आहात ते सांगा हे मी विचारपूर्वक बोलत असल्याचा राज ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणावर फक्त झुलवण्याचं काम होत आहे. अशा प्रकारे आरक्षण मिळू शकत नसल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हाच मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली होती. हा किचकट आणि तांत्रिक विषय असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यासाठी लोकसभेमध्ये कायदा बदलावा लागेल सुप्रीम कोर्टातून आदेश घ्यावा लागेल आणि एकट्या महाराष्ट्रासाठी, एका जातीसाठी या सर्व गोष्टी केल्यास प्रत्येक राज्यातील इतर जाती सुद्धा उठून बसतील आणि ते परवडणार नाही. हे होणार नाही हे प्रत्येक पक्षातील नेत्याला माहित असल्याचं ते म्हणाले. जर कोणी आरक्षण देतो म्हणाला तर पहिल्यांदा कस देणार हे पहिल्यांदा विचारा, असे राज ठाकरे यांनी सांगितलं.