धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आदोंलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ उडाली. मनोज जरांगे यांनी बीडमधील कांचन, आंतरवालीमधील बडे या दोघांचीही नावे घेतली. त्याशिवाय त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबतही गंभीर वक्तव्य केलेय.
अटक होण्याआधी आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बोलणं झाले, सगळ्या नेत्यांनी शीट तपासा, फडणवीससाहेब तुम्हाला काही दिलं असेल तर चेक करा, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, हा कट रचण्यासाठी प्रथम खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला.
जालना पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याचे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलेय. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय विषय आहे हा त्या पोरांना माहिती आहे. बावनकुळे यांच्या भाच्याबद्दल देखील त्यांना माहिती आहे.
वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत. पण ही नसली टोळी संपणं गरजेचं आहे. आरोपीकडे पंकजा मुंडे यांच्याबद्दल खूप काही माहिती आहे. पंकजा मुंडें बद्दल खूप घाण विचार आहेत. जे सत्य आहे ते तुम्ही त्या आरोपीकडून काढा. आरोपीकडेकडे कराड, सुरेश धस, संतोष देशमुख यांच्या भावाबद्दल देखील माहिती आहे, असा गंभीर आरोप केलाय.
जरांगेंनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत, या प्रकरणाचा मुळापासून तपास करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.