पुण्यातील प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पूजा मोरे यांना अखेर निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. भाजप समर्थक आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या टोकाच्या विरोधामुळे अखेर पूजा मोरे यांना पुणे महानगरपालिकेसाठी दाखल केलेली उमेदवारी मागे घेतले. अर्ज मागे घेतांना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच यापूर्वी भाजपच्या नेत्यांविरोधात वक्तव्य केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं.
या सर्व घडामोडीनंतर अखेर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशातच आता याच मुद्दयावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुजा मोरे आणि धनंजय जाधवांवर बोचरी टीका केलीय. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही डिवचलं आहे. पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांचे लगा लगा लगा आणि मला बघा असे झाले आहे. तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. पूजा मोरे यांनी काय काय व्यक्तव्य केलीय हे महाराष्ट्राने पाहिले आहे.असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, पूजा मोरेंनी काय व्यक्तव्य केली आहेत ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेपासून, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्षापर्यंत फिरून झाल्यानंतर कमळावर निवडणूक लढायला निघालाय? आधी यांना ओबीसीमधून उमेदवारी पाहिजे होती. पण ती मिळाली नाही म्हणून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र जनता सजग आहे.', असं म्हणत त्यांनी मोरे यांच्यावर निशाणा साधला.
तुमचा पती धनंजय जाधव ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या गाडीवर दगडे घेऊन मारायला निघाला होता. पूजाताई तुम्ही निवडणुकी आधीच तुम्ही युद्धातून पराभव स्वीकारला आहात. देवराईत देखील तुम्ही असेच दिवे लावले आहे. एका ओबीसीच्या जागेवरून निवडणूक लढवून तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही आता पुणे महापालिकेसाठी निवडणूक लढवायला निघालात, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
तर मोरे यांच्या मुद्द्यावरून हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली. जरांगे पाटील आणि तुमचे कर्तृत्व मोठे आहे. अती केली की माती होते. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत हाकेंनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, राजेश टोपे यांना देखील इशारा दिला.
या सर्व नेत्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, 'हा पिक्चर अजून बाकी आहे. तुम्ही ओबीसी नेते, ओबीसी आरक्षण, ओबीसी समाजाला सोडलं नाही. त्यामुळे आम्ही आहोच, तुम्ही एकदा निवडणुकीला उभे राहत, तुमच्या राजकारणा आमच्या शुभेच्छा.'