बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीपासूनच या प्रकरणावर ,मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आज पुन्हा एकदा बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडे हे आपल्याला भेटायला आले होते, त्यांनी त्यावेळी वाल्मिक कराडची माझ्याशी ओळख करून दिली, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे हे पाया पडले का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर त्यांनी थेट बोलणं टाळत काही राजकीय सामाजिक संकेत असतात ते पाळावे लागतात मी पाळत असतो, येणारा प्रत्येक जण मदत करा म्हणत होता पाया पडणे हा लय मोठा विषय आहे असं मला वाटत नाही, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘धनंजय मुंडे हे मला मराठ्यांनी सांभाळलं असं सांगत होते, पण मग मराठ्यांनी सांभाळलं तर आता मराठ्यांचेच मुडदे पाडायला लागले का? ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. धनंजय मुंडेने मला दोन ते तीन वेळा भेटायचा प्रयत्न केला, गेवराईपर्यंत पण आला होता तिथून माघारी गेला नंतर आठ दिवसांनी परत भेटायला आला’
‘वाल्मीक कराड हा त्या वेळी तिथे आलेला मला माहीत नव्हत, धनंजय मुंडेंनी ओळख करून दिली होती, तेव्हा मी म्हणालो हा तोच आहे का हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा. अनेक राजकिय नेते मला भेटायला आले पण आम्ही कुणाला शब्द दिला नव्हता, देणारही नव्हतो कारण आमचं गणित जुळवणं सुरू होतं. हार्वेस्टर खरेदी करणाऱ्या लोकांना वाल्मिक कराडने मारलं होतं ते लोक माझ्याकडे आले होते, माझ्याकडे लोक आल्यानंतर त्यांच्या एका मध्यस्थीने हा विषय मिटवला आणि तो विषय तिथे थांबला’ आसा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना केला.