दैनिक भ्रमर : स्थानिक स्वराज्य संस्थेचे वारे जोरदार वाहत असताना सकल मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा भाजपाची उमेदवारी कोणत्याही मराठा पुढार्याने घेऊ नये, अशी कडक भूमिका घेत एकप्रकारे सत्ताधारी भाजपाला सकल मराठा समाजाने अल्टिमेटम दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या मोर्चाच्या नियोजनासाठी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैठका सुरू आहेत. भोकर मतदारसंघातील ग्रामीण भागात सध्या चावडी बैठक सुरू आहे. भाजपा सरकारने जर या मोर्चानंतर जरांगे पाटील यांच्या भूमिकेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तर भाजपाकडून मराठा कार्यकर्त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतल्याची चित्रफीत बनवत सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
ही चित्रफीत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न मिळाल्यास मराठा समाजाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपासाठी मोठी चिंता वाढवणारी ठरू शकते.