''हाच  म्होरक्या आहे''.., मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं थेट ''या'' बड्या नेत्याचं नाव,काय आहे प्रकरण ?
''हाच म्होरक्या आहे''.., मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं थेट ''या'' बड्या नेत्याचं नाव,काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान, या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी  पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चोऱ्या दरोडे टाकणारे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत.  

 धनंजय मुंडे या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत, आम्हाला याची 100 टक्के खात्री आहे. मराठ्यांची गरज संपली, आता पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, सिडीआर तपासले तर त्यांचे संबंध उघड होतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्या मराठा समाजाने मदत केली आहे, असं धनंजय मुंडे म्हणतात, आता त्या समाजाशीच ते गद्दारी करत आहेत. आता मराठ्यांची गरज संपली, त्यावेळी मराठ्यांची गरज होती, ते खोट बोलणारच, पण पाप जास्त दिवस झाकत नसतं. टोळी आतमध्ये जाणार म्हणजे जाणारच. मात्र यांनी जर पुरावे नष्ट केले तर याला पूर्णपणे जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अजूनही टोळी सापडत नाही. गेल्या दोन वर्षाचे सीडीआर निघाले पाहिजेत. म्हणजे टोळी कोण चालवत होतं, हे समोर येईल. जात आणि बीड जिल्हा बदनाम झाला आहे.  धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत गुंडगिरीला पाठबळ आणि साथ दिली. कारण हेच टोळी चालवत होते. बाकीच्यांना पुढे घालण्यात आलं, मात्र टोळीचा म्होरक्या हाच आहे. भविष्यात पुरावे नष्ट झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राहतील, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे गुंडगिरी थांबवत नाही, मी त्यांना कितीतरी वेळा सांगितलं टोळी थांबवा, यामुळे तुमचं आणि समाजाचं वाटोळ होईल. पण त्यांना भान राहिले नाही. त्यांना वाटतं टोळी मारा-माऱ्या, भांडण करून आपल्याला पैसे आणून देईल. पण त्यांना हे कळत नाही की यामुळे बीड जिल्ह्याचं किती नुकसान झालं आहे. धनंजय मुंडे हे अजूनही मग्रुरीमध्ये वागत आहेत, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group