मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे यांनी प्रथमच शरद पवारांवर थेट टीकेचे बाण सोडले आहेत.ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसी समाजाचं वाटोळं केल्याचं बोलत असताना मनोज जरांगे यांनी शरद पवारांवरही टीका केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर टीका केली आहे.

१९९४ साली शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं १६ टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं, अशी टीका जरांगे यांनी केली. तसेच ज्या शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्यांचे उपकार ओबीसी नेते विसरले, असंही मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले की, "ओबीसी समाजाला १९९४ साली देण्यात आलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं होतं. आमचं १६ टक्के आरक्षण आम्हाला मिळणार आहे. पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या शरद पवारांचे उपकार ओबीसी नेत्यांना नाहीत. शरद पवारांनी आमचं तर वाटोळंच केलं. 1994 साली आमचं आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलं."
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या आधी अनेकदा आंदोलनं केली. या आंदोलनांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप अनेकदा भाजपच्या नेत्यांनी केला होता. त्यावेळी जरांगे यांनी शरद पवारांवर टीका केली नव्हती. पण आता शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.