मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करायला बसले आहेत. काहीही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेणार, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. मनोज जरांगे यांनी पोलिसांच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा इशारा दिला आहे.
'सरकारला नासक्याची सवय लागलीये. आम्ही उल्लंघन केले नाही, तरीही तसेच म्हणायचं. मैदानात ५ हजार लोक आहेत. इथं बसू नका म्हटल्यावर कुठं थांबणार. थोडं इकडं तिकडं फिरणारच. तुम्ही सांगितलेल्या जागेवर लोक आहेत. रस्त्यावर गाड्या नाहीत. सीएसएमटी, बीएमसी परिसर रिकामा केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अन्यायकारक वागू नये. ते न्यायदेवतेला खोटी माहिती देताहेत. देवेंद्र फडणवीस हे खोटारडा आणि कुटील डाव खेळत आहेत. फडणवीसांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. मग परिणामी फडणवीस कुठल्याही थराला गेले तरी मी देखील तयार आहे त्या थराला जायला. मराठे काय असतात हे ३५० वर्षांनी पुन्हा एकदा बघायचं असेल तर मला नाईलाज आहे. ही लढाई आपण शांततेत लढायची. पण मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, मी हे देवेंद्र फडणवीसांना ठासून सांगतोय, मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही, फक्त कारणं करू नका. न्यायलयाच्या सर्व निर्णयाचं आपण पालन करायचं आहे. न्यायदेवता आपल्या गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, असंही मनोज जरांगे यांनी बोलताना म्हटलं आहे.