कबुतरांना दाणे टाकणं भोवलं ! व्यापाऱ्याला थेट कोर्टाचा दणका, देशातील पहिलीच शिक्षा
कबुतरांना दाणे टाकणं भोवलं ! व्यापाऱ्याला थेट कोर्टाचा दणका, देशातील पहिलीच शिक्षा
img
वैष्णवी सांगळे
मुंबईत कबुतराला दाणे टाकल्यामुळे एका व्यापाऱ्याला थेट कोर्टाने दणका दिला आहे. लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहोचवत असल्याचा ठपका ठेवत व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. दादर येथील कबुतरखान्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली.

 या निर्णयामुळे काही जण नाराज झाले. त्यावरून अनेक जण रस्त्यावर उतरले. पण मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतरही काही जण दादर येथे येऊन दाणे टाकत होते. दादर परिसरात राहणारे व्यापारी नितीन शेठ यांना याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्यांना दंड ठोठावला. अशाप्रकारची ही देशातील पहिली शिक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी कोर्टाने व्यापाऱ्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी सोमवारी हा निकाल दिला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 (ब) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. व्यापाऱ्याने लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहचवल्याचे स्पष्ट झाले. 

या निकालपत्रात कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची शिक्षा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. हे एक उदाहरण आहे. त्यामुळे लोकांनी भविष्यात असे कृत्य करु नये असे मत न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले. बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) यापूर्वीच कबुतरांना दाणे टाकण्यावर प्रतिबंध घातला आहे. ऑगस्ट महिन्यात याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रतिबंध कायम ठेवला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group