नवी मुंबईमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत काही अल्पवयीन मुलींसह ५ महिलांना वेश्याव्यवसायाच्या कचाट्यातून मुक्त केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बेकायदेशीर व्यवसाय चालवणारे लोक सोशल मीडियावरून ग्राहकांना आमिष दाखवत होते.
ग्राहकांना यानंतर वाशी, नेरूळ आणि तुर्भे यांसारख्या भागात लॉज किंवा हॉटेलमध्ये रूम बुक करण्यास सांगितले जायचे, त्यानंतर महिलांना त्या ठिकाणी पाठवत असे. आरोपी ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार रूपये आकारायचे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या रॅकेटचा भंडाफोड करण्याचा प्लॅन आखला.
८ जुलै रोजी पोलिसांनी तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला, आरोपींनी एका महिलेला पाठवताच पोलिसांनी छापा टाकला. तसेच महिलेची सुटका केली. नंतर नेरूळ येथील एका फ्लॅटमधून पोलिसांनी ४ महिलांची सुटका केली. या कारवाईत प्रमुख सूत्रधार, एक मध्यस्थ आणि ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील ३ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांना पोलिसांनी १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नवी मुंबईत खळबळ उडाली असून, आणखी काही वेश्याव्यवसायाच्या निगडीत रॅकेट सक्रीय आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.