दैनिक भ्रमर : दादर कबुतरखान्यासाठी अडून बसणाऱ्या जैन समुदायाला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार आहे. या समितीने थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी श्वसनासंबंधी आजार लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई केली होती. तसेच ते कोणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. 6 ऑगस्टला जैनधर्मीयांनी अचानक हल्लाबोल करत कबुतरखान्यावरील ही ताडपत्री फाडून टाकली होती. यावेळी दादर कबुतरखान्याच्या परिसरात जमलेला जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता. पालिकेने ताडपत्री टाकण्यासाठी वापरलेले बांबू मोडून टाकण्यात आले होते.आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावीविरुद्ध मराठी एकीकरण समिती मैदानात उतरणार आहे.
मराठी एकीकरण समितीने जैन समुदायाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. कबुतरखाना हा कायमचा बंद झाला पाहिजे. त्यासाठी बुधवारी दादरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. त्यामुळे आता पोलीस मराठी एकीकरण समितीच्या या आंदोलनाला परवानगी देणार का, हे पाहावे लागेल. कबुतरखाना बंद की सुरू याची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट ला पार पडणार आहे . तोपर्यंत न्यायालयाचा आदेश असल्याने कबुतरखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.