मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील जेवणामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राडा घातला. शिळे जेवण दिल्यामुळे गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला . याबाबत गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत कॅन्टीनच्या जेवणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
काय म्हणाले संजय गायकवाड ?
आमदार गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले. खराब डाळ आणि भात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला जाब विचारला, पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ऑपरेटरला बेदम मारले. लाथा-बुक्क्यांनी चोपलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मारहाण केल्याचा मला कोणताही पच्छाताप नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले, मी ३० वर्षांपासून आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये येत आहे. मागील ५.५ वर्षांपासून येथे राहत आहे. कॅन्टीनमध्ये चांगले अन्न पुरवण्याची वारंवार विनंती केली. अंडी १५ दिवस जुनी, नॉन-व्हेज १५-२० दिवस जुने, भाज्या २-४ दिवस जुन्या असतात. जवळपास ५,००० ते १०,००० लोक येथे दररोज जेवतात. प्रत्येकाची जेवणाबाबत तक्रार आहे. कोणाला अन्नात पाल सापडते, तर कोणाला उंदीर किंवा दोरी सापडते. अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते.
मी मंगळवारी रात्री १० वाजता जेवण मागवले. पहिला घास घेताच मला काहीतरी गडबड वाटली. वास घेतल्यावर लक्षात आले की अन्न खराब झाले आहे. मी खाली जाऊन मॅनेजरला विचारले की, हे कोणी बनवले. मी सर्वांना अन्नाचा वास घ्यायला सांगितला. तिथे असणाऱ्या सर्वांना ते खराब वाटले, असे संजय गायकवाड म्हणाले.
स्वच्छ आणि चांगले अन्न बनवावे, असे मी त्यांना पुन्हा समजावले. विषासारखे अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तरीही त्यांनी ऐकलेच नाही.
त्यामुळे त्यांना माझ्या पद्धतीने समजावलं. दरवर्षी सरकारला हजारो तक्रारी येतात. पण त्या दुर्लक्षित का केल्या जातात, याबाबत मला माहिती नाही. त्याची चौकशी का होत नाही? स्वयंपाकघरात उंदीर आणि घाण आहे. याची तपासणी व्हायला हवी, पण कोणालाच याची पर्वा नाही. यावर कारवाई व्हावी, अशी माझी विनंती आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.