मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या युतीला मोठं यश मिळालं, तर ठाकरे बंधूंना पराभवाचा धक्का बसला. आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे शिंदेंनी भाजपाकडे अडीच वर्षे महापौरपदासाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा रंगली. या घडामोडी सुरू असतानाच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा’, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती. बाळासाहेबांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले की, बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करणं हेच मुख्य उद्दिष्ट असायला हवं. त्यांनी सांगितलं की, राजकारणात मतभेद असू शकतात, पण बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांचा वारसा जपणे सर्वाधिक महत्वाचे आहे.
भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना आवाहन करत म्हटले की, उद्धव ठाकरेंना बाजूला ठेऊन महापौरपदासाठी राजकीय प्रयोग करणे चुकीचे आहे. त्याऐवजी, बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान करत, उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांना बरोबर घेत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन, बाळासाहेबांना आदरांजली म्हणून, बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही महापौर करू हे सांगण्याचं धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवावं असं थेट चॅलेंज भास्कर जाधव यांनी शिंदेंना केलं आहे .