नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये शनिवारी रात्री शिवसेनेचा (शिंदे गट) मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी हम जहाँ खडे होते है, लाईन वहाँ से शुरू हो जाती है…मी जिथे उभा राहतो, तिथून जनसेवा सुरू होते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मी वाहनात, कार्यालय, घर, कार्यक्रमात येताना कुठेही असू लोकांची निवेदने घेत असतो. हम जहाँ खडे होते है, लाईन वहाँ से शुरू हो जाती है…मी जिथे उभा राहतो, तिथून जनसेवा सुरू होते. तसेच मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत म्हणाले. तसेच , त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणातून विरोधकांवर टीका केली. मी कधीही स्वत:ला नेता समजलो आणि समजणारही नाही. कार्यकर्ते आपल्याला मोठे करतात. दु:ख, अडचणीमध्ये नेत्यांनी उभे राहिले पाहिजे ही कार्यकर्त्याची अपेक्षा असते. आपण इतके केले तर हा कार्यकर्ता आपल्यासाठी अहोरात्र काम करत जीवाची बाजी लावायला तयार असतो असे शिंदे म्हणाले.
संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहेत. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना सर्वसामान्य नागरिकांशी बांधिल आहे. भारतात २३ राज्यांमध्ये शिवसेना आहे. मी काल ही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. बाळासाहेब आपल्याला सवंगडी समजायचे. परंतु त्यांच्या पश्चात काही लोक आपल्याला घरगडी समजू लागले होते. खरा वाघ कोण आणि वाघाचे पांघरून घेतलेले लबाड कोल्हे कोण हे जनतेने दाखवून दिले आहे अशी टीका देखील त्यांनी केली.
तसेच ते पुढे म्हणाले मी कधीही खूर्चीसाठी कासावीस झालो नाही. कधीही तडजोड करणार नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पायाला भिंगरी लावून आम्ही काम केले आहे. महायुतीत मी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आम्ही एक टीम म्हणून काम केले. अनेक योजना, प्रकल्प आणले. इतिहासात नोंद होतील इतके आम्ही निर्णय घेतले. तसेच कोणताही भूमिपूत्र घरापासून वंचित राहणार नाही. ही खात्री मी देतो असेही शिंदे म्हणाले.