राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विधासभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज असल्याचे समोर आले होते. दरम्यान विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का सहन करावा लागला आणि आघाडीतून अनेक नेत्यांनी काढता पाय घेतला होता.
दरम्यान, काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दीड महिन्यातच त्यांनी शिवसेना शिंदे गटातून बाहेर पडण्याचे ठरविले असून, यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.
मी पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असे त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
हेमलता पाटील यांनी ३० ते ३५ वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत राहून विविध पदांवर काम केले. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही हेमलता पाटील यांना काम करताना अडचणी येत होत्या. पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना झाल्याने मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे, असे फेसबुक व्हिडीओतून हेमलता पाटील यांनी सांगितले आहे.सध्या मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता स्वतःच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम सुरू ठेवणार असल्याचे हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहणार राहिन, असं त्यांनी नमूद केलं.