बिश्नोई गँगची काँग्रेस आमदाराला धमकी, 10 कोटी दे, नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू
बिश्नोई गँगची काँग्रेस आमदाराला धमकी, 10 कोटी दे, नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू
img
वैष्णवी सांगळे
अकोल्यात बिष्णोई गँगकडून सलग दुसऱ्या आमदाराला खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकरकडून १० कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 

काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान धमकीचा कॉल आल्याची माहिती आहे.  "दोन दिवसात 10 कोटी रुपये दे.‌ नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू", अशी शुभम लोणकरकडून आमदार पठाण यांना धमकी देण्यात आली आहे. शुभम लोणकरकडून आलेला कॉल हा कॅलिफोर्नियावरून आल्याचं समोर आलं आहे. आमदार साजिद खान यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिली. त्यांनी कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांकडे दिले. तर त्याचवेळी त्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्जही सादर केला.

बिश्नोई गँग आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजकांच्या मागे लागली होती. मुंबईतील घटनांवरून ते समोर आले. शुभम लोणकर हा वऱ्हाडातील आहे आणि त्याचे बिश्नोई गँगशी लागेबंध असल्याचे समोर आले आहे. आता गँग राजकारण्यांनाही धमक्या देत असल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी ४ सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर दोन आमदारांना धमकीचे फोन आल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चंद्रक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यांनी सुरक्षा आणि तपासाची माहिती घेतली.

आमदार साजिद खान पठाण यांची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस तांत्रिक बाबींचा मागोवा घेत तपास करत आहे. धमकी नेमकी कुणी दिली आणि यामागे शुभम लोणकर आणि त्याच्या भावाचा काय हात आहे यादृष्टीनेही तपास सुरू आहे. राजस्थानसह इतर राज्यातील बिश्नोई गँगशी संबंधित तपास सुरू आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group