बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनमोलचं अमेरिकेतून प्रत्यार्पण, मोठ्या गुन्हयांचा उलगडा होणार
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनमोलचं अमेरिकेतून प्रत्यार्पण, मोठ्या गुन्हयांचा उलगडा होणार
img
वैष्णवी सांगळे
संघटित गुन्हेगारीविरोधात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. मुंबईतील दोन अत्यंत हाय-प्रोफाइल गुन्हे – दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या प्रकरणांमध्ये अनमोल बिश्नोई मुख्य आरोपी आहे.

अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात डिपोर्ट केल्याची माहिती आता अधिकृतपणे समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार NIA ची टीम अनमोल बिश्नोईला घेण्यासाठी टर्मिनल ३ वर पोहोचली आहे. प्रक्रियेनुसार, दिल्ली पोहोचताच अनमोलला NIA ताब्यात घेईल. अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी त्याच्याकडून केली जाणार आहे. त्यामुळे त्याला कोणत्या एजन्सीच्या ताब्यात दिलं जावं, याचा निर्णय केंद्र सरकार करणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भातही अनमोलची चौकशी होणार आहे. त्यामुळे मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे. 

2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातही अनमोल बिश्नोईचं नाव समोर आलं होतं. 12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मकोकाच्या कडक तरतुदीदेखील लागू केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आली. तर अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि झीशान मोहम्मद अख्तर हे आतापर्यंत वाँटेड होते. आता अनमोलच्या प्रत्यार्पणानंतर या सर्व प्रकरणांचा तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group