आणीबाणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल , काय म्हणाले वाचा सविस्तर
आणीबाणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल , काय म्हणाले वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीवरून काँग्रेस वर जोरदार हल्लाबोल केला. ते लोकसभेत बोलत होते. देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा काँग्रेसने  आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले.लोकांना तुरुंगात टाकलं, देशाला तुरुंगखाना बनवलं.  प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच,  जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कपाळावरील पापाची चर्चा होईल, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम तेव्हा काँग्रेसन केलं असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानाच्या ५०व्या वर्षी वाजपेयींनी हा दिवस साजरा केला होता. संविधानावर चर्चा घडवून आणली होती. मलाही संविधानाच्या प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मी मुख्यमंत्री असताना संविधानाला ६० वर्ष झाले होते. तेव्हा संविधानाचा ६० वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संविधानाची प्रत हत्तीवर ठेवून रॅली काढली, तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली पायी चालत होता. आमच्यासाठी संविधानाचं मोठं महत्त्व आहे. आज संविधानाला ७५ वर्ष होत आहेत. मला त्यावर बोलण्याची संधी मिळाली आहे.

तसेच, चढ उतार आले, पण देशातील जनता संविधानाच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. काही तथ्य मला सांगायचे आहेत. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की 75 वर्षांपैकी एकाच कुटुंबाने 55 वर्ष राज्य केलं. त्यामुळे देशात काय काय झालं? हे माहीत करून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे, अशी टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group