रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४ वर्षांनंतर आज भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा भारत दौरा २ दिवसांचा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान रशिया आणि भारत यांच्यामध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-रशिया संरक्षण करारांव्यतिरिक्त भारतातून १० लाख कुशल कामगारांना रशियात रोजगार देण्यासाठी मोबिलिटी पॅक्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये नागरिक अणुकरार होऊ शकतो. या करारामुळे लहान अणु रिअॅक्टरच्या योजनेला बळ मिळून जाईल. रशिया S-400 क्षेपणास्त्र प्रणाली, Su-57 लढाऊ विमाने आणि वाढत्या तेल निर्यातीसाठी नवीन करारावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत होईल. व्लादिमीर पुतिन आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीत पोहचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी खास डिनरचे आयोजन केले आहे. त्यानंतर द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीचा विषय संरक्षण, ऊर्जा, अवकाश आणि व्यापार यावर केंद्रित असेल.
पुतीन यांना राष्ट्रपती भवनामध्ये गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे.. शुक्रवारी म्हणजे ५ डिसेंबर रोजी पीएम मोदी आणि पुतीन हैदराबाद हाऊसमध्ये शिखर बैठक करतील. पुतीन यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारत- रशिया धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करणे हा आहे.