पेहेलगाम येथे दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला. यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे. त्यामुळे भारताच प्रत्युत्तर कसं असेल? याची चर्चा सुरु आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलत होते.
बिहारमध्ये ही जनसभा आयोजित करण्यात आली होती. तिथे दहशतवाद्यांच्या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींनी खूप मोठ वक्तव्य केलं आहे. निश्चितच पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई होणार. याआधी सर्जिकल स्ट्राइक नंतर एअर स्ट्राइक केला होता. आताची कारवाई त्यापेक्षा सुद्धा मोठी असेल असे संकेत पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून मिळाले आहेत.
“22 तारखेला दहशतवाद्यांनी पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे मारलं. त्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे. कोटी कोटी देशवासी दुखी आहेत. सर्व पीडित परिवारांच्या दुखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ज्या कुटुंबातील अधिक इलाज चालू आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ गमावला, कुणी जीवनसाथी गमावला आहे. कुणी बांगला बोलत होतं. कोणी कन्नड बोलत होतं. कोणी मराठी, कोणी ओडिया, कुणी गुजराती, तर कुणी बिहारचा लाल होता. आज त्यांच्या मृत्यूवर कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एक सारखं आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली’
“आपला आक्रोश एक सारखा आहे. पर्यटकांवरच हल्ला झाला नाही. देशाच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. मी स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली जाईल. त्यांना शिक्षा देणारच. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकीच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.