भारतीय जनता पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. तीन नबीन हे आतापर्यंत भाजपला मिळालेले सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. वयाच्या ४५ व्या वर्षी नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी त्यांना माळ घालून त्यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी म्हटले की, आज भाजपाचं लक्ष संघटनेच्या विस्तारावर आहे तसे कार्यकर्ते घडवण्याकडेही प्राधान्य आहे. भाजपा हा एक असा पक्ष आहे जिथे कदाचित लोकांना वाटत असेल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. तिसऱ्यांदा ते पंतप्रधान बनलेत. वयाच्या ५० व्या वर्षी मुख्यमंत्री बनलेत. २५ वर्ष सातत्याने प्रशासनात मुख्य आहेत परंतु हे सर्व ज्या त्या जागी आहे. यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. हा माझ्यासाठी गर्व आहे. जेव्हा पक्षाची बाब असेल तेव्हा नितीन नबीन हे माझे बॉस आहेत आणि मी कार्यकर्ता आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
दिल्लीत भाजपा मुख्यालयात पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.