महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनी तिकीट नाकारल्याने आज भाजपच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरले.
दिव्या मराठे यांनी यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला. त्या म्हणाल्या, "जेव्हा पक्ष कठीण काळात होता, तेव्हा माझी मुले लहान असतानाही मी घरादाराचा विचार न करता पक्षाचे काम केले. आज पक्ष एक नंबरवर आल्यावर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात आणि कार्यकर्त्या महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का?" असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"१८ वर्षे पक्षाचे काम केले, १८ केसेस अंगावर घेतल्या, पण आज १५ दिवसांपूर्वी आलेल्यांना तिकीट दिले जात आहे," असा संताप व्यक्त करत दिव्या मराठे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर हल्लाबोल केला. दिव्या मराठे या उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छूक उमेदवार आणि काही कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवंत कराडांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला.
तसेच या महिलेने बाटलीतून पेट्रोल आणले होते. तिने हे पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला. दिव्या मराठे यांच्यासह भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यापैकी काही जणांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरी सोडली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलला, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले..