उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री कमला नेहरू नगर परिसरात एनएचआरएफ रोडवर भाजप नगरसेविका शीतल चौधरी यांच्या कारवर अज्ञात बाइकस्वारांनी गोळीबार केला. त्या नोएडाहून आपल्या घरी परतत होत्या. शीतल चौधरी या भाजपच्या गाझीयाबादमधील स्थानिक नगरसेविका असून, परिसरात त्यांच्या सक्रीय राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे ओळखल्या जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री सुमारे 8:30 वाजता घडली. शीतल चौधरी या गोविंदपुरमहून संजय नगरकडे आपल्या कारने एकट्याच जात होत्या. त्याचवेळी दोन हेल्मेटधारी अज्ञात तरुण मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी अचानक त्यांच्या कारला ओव्हरटेक करून दोन फायर राउंड केले. गोळी कारच्या विंडशील्डवर आदळली, परंतु शीतल यांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा तोल न गमावता कार सुरक्षित स्थळी नेली.
सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या पांढऱ्या क्रेटा कारची पुढील काच पूर्णपणे फुटली आहे. घटनेची माहिती मिळताच कविनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू केले आहे.