उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातील गळतीमुळे आधीच डोकेदुखी वाढली असताना ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
बडा नेता भाजपच्या गळाला
सुभाष भोईर हे ठाणे महापालिकेत ५ वेळा नगरसेवक होते. शिक्षण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्याशिवाय ठाणे महापालिकेत ४ वेळा विरोधी पक्षनेते राहिले आहेत. सिडकोचे संचालक म्हणून काम करत होते. काही काळ ते विधान परिषदेचे आमदार होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून ते कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे संपर्कप्रमुखपद त्यांच्याकडे होते.
सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आहेत. त्याठिकाणी विद्यमान आमदार राजेश मोरे हे शिंदेसेनेचे आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर यांना शिवसेनेचा एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐन निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी भोईर यांच्या तोंडचा घास हिसकावून कल्याण ग्रामीणची उमेदवारी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिली. तेव्हापासून शिंदे आणि भोईर यांच्यात दुरावा आहे.
२०२२ मध्ये शिंदे यांनी ठाकरेंची फारकत घेतल्यानंतर सुभाष भोईर ठाकरेंसोबत कायम राहिले होते. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुभाष भोईर श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्यास इच्छुक होते परंतु ठाकरेंनी भोईर यांच्याऐवजी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सुभाष भोईर नाराज होते. अखेर आज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.