राज्यात पक्षांतरे काही थांबण्याचे काही नाव घेत नाही. मुख्य म्हणजे महायुती सरकारमधील पक्षतील नेतेच भाजपच्या वाटेवर असल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात आगामी पालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना भाजपमधील वाढणारे पक्षप्रवेश इतर पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे.
भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील प्रमुख नेत्यांचा प्रवेश करून घेण्यासाठी हालचालींना वेग आला असून तशा स्वरूपाचं वृत्त समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील १४ माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्या पक्षातील खडकवासला, पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर आणि शिवाजीनगर मतदारसंघातील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. निवडून येण्याची खात्री वाटत असल्याने बहुतांश नेत्यांकडून भाजपमध्ये प्रवेश मिळवून उमेदवारी कशी मिळेल, यासाठी आटापिटा सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचीही नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या १४ माजी नगरसेवकांची नावे अजित पवारांना सांगण्यात आली आहेत. या नेत्यांच्या सध्याच्या प्रचारातून पक्षाचे चिन्हच गायब झाल्याचे त्यांना दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच या संभाव्य इनकमिंगबाबत नाराजी व्यक्त केल्याची राष्ट्रवादीत चर्चा आहे. प्रवेशांवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक, तर राष्ट्रवादीला दुसरा न्याय, असाही प्रश्न राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.