बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं, त्यानंतर फक्त बिहारच नाही संपूर्ण देशात भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र या विजयाच्या दुसऱ्या दिवशीच भाजपने मोठी कारवाई करत पक्षातील तिघांची हकालपट्टी केलीय. या कारवाईने एकच खळबळ उडालीय.
माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह, आमदार अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपने या तीन नेत्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केलं आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी एका भाषणात जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी नितीश कुमार सरकारवर ६२ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. बिहारमधील भाजप नेते सम्राट चौधरी यांना 'खुनी' म्हटलं होतं. आर के सिंह यांच्या विधानाने भाजपसहित जनता दल युनायटेड पक्षाची प्रतिमा डागाळली होती. यानंतर भाजपने ही कारवाई केली आहे.