भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. . त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळासह अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहिल्यानगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचा दूध व्यवसाय हा मूळ व्यवसाय होता. २०१४ च्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. अल्पशा आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
शिवाजी कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१४ ला पुन्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.