नाशिक :- भाजप नेतृत्वाने अनेक वेळा समज देऊन सुध्दा सतत भाजपच्या ध्येयधोरणा विरोधी भुमिका घेत असल्यामुळे नाशिक रोड येथील भाजपचे बुद्धिजीवी प्रकोष्टचे महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक रोहन देशपांडे यांची भाजप मधुन ६ वर्षांकरिता हकालपट्टी करण्यात आल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.
रोहन देशपांडे यांनी सतत भाजपच्या विरोधात प्रतिक्रिया देणे, तपोवन येथील वृक्ष तोडी संदर्भात अनेक वेळा भाजपने खुलासे करून सुध्दा रोहन देशपांडे यांनी वेळोवेळी भाजपच्या विरोधात भुमिका घेतल्या. भाजपच्या केंद्रीय व प्रदेश नेतृत्वाने एखाद्या विषयावर भुमिका घेतल्यानंतर देशपांडे हे सतत त्याविरोधात भुमिका घेत होते. विशेषतः डावे पक्ष, मनसे, काँग्रेस, ऊ बा ठा या पक्षांच्या नेते, कार्यकर्ते यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सतत भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे रोहन देशपांडे हे भाजपचे की भाजप विरोधी पक्षांचे नेतृत्व व प्रतिनिधित्व करतात की काय ? असा प्रश्न येतो.
अशा सवंग लोकप्रियतेसाठी वारंवार वृत्त पत्रे, टी व्ही चॅनल वर भाजप विरोधी भुमिका व वक्तव्ये करणाऱ्या वृत्ती, प्रवृत्ती भाजप मध्ये नकोच अशी भूमिका स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे मांडली होती. त्याची गंभीर दखल घेऊन भाजप प्रदेशने रोहन देशपांडे यांची भाजपमधून ६ वर्षांकरिता हकालपट्टी केल्याचे अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.
भारतीय जनसंघ पक्षाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांनी अशाच प्रकारे वेळोवेळी पक्षाला आव्हान दिले होते. त्यांचे नाव लोक विसरले तर हे रोहन देशपांडे कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो. यापुढे जे जे भाजपच्या विचार धारेच्या विरोधात भुमिका घेतील त्यांच्यावर कोणताही मुलाहिजा न ठेवता शिस्तीचा बडगा दाखविला जाईल असे केदार यांनी म्हटले आहे.