पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जात असताना भाजप खासदार आणि आमदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधून ही बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना उत्तर बंगालमधील नागरकाटा येथे घडली. भाजप खासदार खगन मुर्मू आणि भाजप आमदार शंकर घोष यांच्यावर साहित्य वाटप करत असताना स्थानिकांनी हल्ला केला.

नागरकाटा येथे सध्या पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही नेते मंडळी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले. भाजप खासदार खगेन मुर्मू देखील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. त्यांनी नागरकाटा येथे साहित्य वाटप केले. साहित्य वाटप करताना संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सिलीगुडीचे आमदार डॉ. शंकर घोष आणि मालदा उत्तरचे खासदार खगेन मुर्मू पूरग्रस्तांना मदतसामग्री वाटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी काही लोक चिडले आणि त्यांनी वाद घालण्यास, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आमदार आणि खासदार यांच्या अंगरक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने दगडफेक सुरू केली. एक दगड मुर्मू यांच्या डोक्याला लागला, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, भाजप आयटी विंगचे प्रमुख अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 'सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित व्यक्तीचा या घटनेमागे हात आहे', असा आरोप त्यांनी केला. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे.