काही दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भाजपावर मतचोरीचा आरोप करत आहेत. मालूर विधानसभा मतदारसंघ हा कोलार लोकसभा मतदारसंघात येतो. तसेच हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथे आतापर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने चार वेळा बाजी मारली आहे. तर भाजपाने २ वेळा आणि जेडीएसने एकदा येथे विजय मिळवला होता. याच मतदारसंघात आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १,००,२५० मतांची चोरी केली, असे राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांच्या या दाव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या.
यादरम्यान भाजपाच्या एका उमेदवाराने काँग्रेसवर मतचोरीचा आरोप करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी (१६ सप्टेंबर) या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने विधानसभा मतदारसंघाचा निकाल रद्द करून फेरमतमोजणीचे आदेश दिले आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यातील मालूर विधानसभा मतदारसंघाचा २०२३ चा निवडणूक निकाल रद्द केला आहे. न्यायालयाने मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेचा दाखला देत चार आठवड्यांच्या आत फेरमतमोजणीचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे निवडून आलेले आमदार के. वाय. नंजेगौडा यांना मोठा धक्का बसला आहे.
सुमारे दोन वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिकाकर्ते भाजपाचे उमेदवार के. एस. मंजीनाथ गौडा यांच्या बाजूने निकाल दिला आहे. सध्या उच्च न्यायालयाने आपला निकाल पुढील ३० दिवसांसाठी स्थगित ठेवला असून, नंजेगौडा यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.