राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. यानुसार, राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी केली जाईल. ही निवडणूक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे पार पडेल आणि यासाठीची आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे. या निवडणुका ऑक्टोबरच्या अखेरीस अद्ययावत केलेल्या मतदार यादीनुसार घेण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तयारी सुरु झाली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांनी नावांची यादी पाठवण्यात आली आहे. 'मित्र पक्षांसोबत युती करायची की नाही करायची, युती करायची असेल तर कशाप्रकारे पुढे जायचं? नसेल करायची तर स्वबळासंदर्भात कसं लढायचं? यासंदर्भात देखील या सगळ्या निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने प्रत्येक नगरपालिकेमध्ये मोर्चेबांधणी केली होती. या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि शहर कार्यकारिणीशी चर्चा करून प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात नगराध्यक्ष कोण असावा, याबाबतही निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत.