१४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 'खून बदला खून से' असाच प्रकार पहायला मिळाला. १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एका मुलाने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील मंगळुरा गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी ३० वर्षीय राहुल नावाच्या तरुणाने ४५ वर्षीय जयवीर या व्यक्तीवर गोळी झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर राहूल घटनास्थळावरून पसार झाला.

अधिक माहितीनुसार, जयवीर शेतातील काम संपवून घरी जात असताना राहुलने त्याच्यावर अचानक गोळीबार केला. गोळी थेट जयवीरच्या डोक्यावर लागल्याने तो जागीच ठार झाला. गावकऱ्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनस्थळावर पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पोलीस तपासानुसार, या खुनामागे जुनी दुश्मनी कारणीभूत असल्याचे कळाले. २०११ साली जयवीरने झिंझाना परिसरात राहुलच्या वडिलांची, ब्रिजपाल नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला ११ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण करून सुटल्यावर जयवीर गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गावात शांततेत राहत होता. मात्र त्याच्या जुन्या गुन्ह्याचा परिणाम इतक्या वर्षांनी पुन्हा समोर येईल असे कोणालाही वाटले नव्हते.
राहुलने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेत जयवीरचा जीव घेतला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की आरोपी राहुल सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या हत्येचा बदला प्रकरणामुळे मंगळुरा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.