बिहारमधील मुजफ्फरपूरमधील नवलपूर मिश्रुलिया गावात सामूहिक आत्महत्येची ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्येमुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झालाय. बापाने ३ मुली, दोन मुलांसोबत गळफास घेत सामूहिक आत्महत्या केली. २ मुलांनी गळफास तोडून पळ घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण वडील अन् तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. राधा कुमारी (११), राधिका (९) आणि शिवानी (७) या मुलींचा मृत्यू झाला. शिवम अन् चंदन पळून गेल्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचलाय.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ राम यांनी पत्नीच्या साडीने घरातच फास बांधून टोकाचा निर्णय घेतला. अमरनाथ राम यांच्या त्यांच्या पाच मुलांच्या गळ्यातही हा फास बांधला. शिवम आणि चंदन या दोघांनाही गळफास घेण्यास भाग पाडले. अमरनाथने याने पत्नीच्या साडीने पाचही मुलांच्या गळ्यात फास बांधला. त्यांना घरातील जुन्या पेटीवर चढायला लावले अन् घराच्या छताला लटकवले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला.
शिवम आणि चंदन या दोघांचा जीव वाचला. शिवमने पोलिसांना सांगितले की, 'वडिलांनी सर्व मुलांना पेटीवर चढून उडी मारण्यास सांगितले. तिन्ही मुलींनी त्यांच्या वडिलांसोबत उडी मारली.' शिवमनेही उडी मारली होती पण घशात तीव्र वेदना होत असल्याने फास सोडला आणि स्वतःला बाहेर काढले. शिवमने धाकटा भाऊ चंदनच्या गळ्यातील फास सोडला आणि त्याला वाचवले. त्यानंतर शिवमने घरातून बाहेर पळ काढला अन् आवाज दिला. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले.
गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, अमरनाथच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर अमरनाथ मानसिक त्रासात होता. तो पत्नीच्या आठवणीत झुरत होता. त्यामधून त्याने टोकाचा निर्णय घेतला. अमरनाथ राम बेरोजगार होता आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सरकारी रेशनवर त्याचे घर चालत होते. कौटुंबिक कारण अन् आर्थिक परिस्थितीमुळेच त्याने आयुष्य संपवले.