नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आडगाव शिवारातील कोणार्कनगर भागात एका विवाहितेने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आत्महत्येआधी विवाहितेने दोन्ही मुलींना विष पाजल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की अश्विनी निकुंभ या विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तिने घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्र्तविला. पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना विवाहितेची 7 वर्षीय व 2 वर्षीय या दोन्ही मुली मृत अवस्थेत आढळून आल्या. दोघींना विष पाजून त्यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
शवविच्छेदनानंतर हे उघडकीस येईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली. त्यात अश्विनी यांनी म्हटले आहे, की पतीच्या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी दोन्ही मुलींना विष देऊन आत्महत्या केली.
नोटमध्ये पुढे म्हटले आहे, की भूतकाळातील गोष्टींवरून पती स्वप्नील निकुंभ मला मानसिक व भावनिक खूप त्रास देत आहे. पतीच्या भावाशी व बहिणीशी भांडण झाल्यामुळे पतीने भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. स्वप्नीलने अश्विनी यांच्या आईकडून 6 लाख रुपये व मामांकडून 2 लाख रुपये घेतल्याचेही त्यात नमूद केले आहे. ते त्याने परत करावेत, तसेच ही सुसाईड नोट गायब करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही केले आहे. आम्हा तिघींचा जीव घेणाऱ्या स्वप्नील, त्याचा भाऊ व बहीण यांना शिक्षा मिळावी, असे त्यात म्हटले आहे.