राज्यभरात सध्या भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असताना स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पण मनोहर भोसले याला या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. फसवणूक झालेल्या फिर्यादीने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं तो या भोंदू मामाच्या जाळ्यात कसा सापडला यांची सर्व माहिती पोलिसांना दिली आहे.
काळ्या जादुची अघोरी विदया प्राप्त
दिनांक 21/04/2026 रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार आणि त्यांचा मित्र दोघे कुर्डूवाडी येथे कामानिमित्त गेले होते. रात्री 10:00 वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी हॉटेल शोधत कुर्डूवाडी बायपास रोड येथे थांबले होते. त्यावेळी तक्रारदार धंद्यामध्ये मला यश येत नसल्याबाबत माझा मित्राला सांगत चर्चा करत असताना एक अनोळखी इसम हा बोलणे ऐकुन त्यांच्याजवळ आला व तुम्हाला तुमच्या व्यवसायात, आयुष्यात अडचणी येत आहेत का? त्यावेळी तक्रारदाराने व्यवसायामध्ये यश येत नसल्याबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले त्यावेळी अनोळखी इसमाने तुम्हाला जर व्यवसायामध्ये यश येत नसेल तर मनोहर मामा भोसले हे महाराज आहेत.
त्यांना काळ्या जादुची अघोरी विदया प्राप्त आहे ते काळी जादु करून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करतात तुम्हाला ही तुमच्या अडचणी दूर करायच्या आहेत का? असे सांगुन त्यांनी तक्रारदाराला 937XXXXXXX हा मोबाईल नंबर दिला व हा नंबर मनोहर मामा भोसले यांचा असल्याचे सांगितले म्हणून तक्रारदाराने मोबाईल नंबर वरून सदर नंबरवर कॉल केला व अडचन सांगुन कामाबाबत विचारले असता त्यांनी तक्रारदाराला 9156XXXXXX या नंबरवर व्हिडीओ कॉल करून त्यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले.
अगोदर 50 हजार रूपये ॲडव्हान्स भराव लागेल....
तक्रारदाराने आयुष्यात खूप अडचणी असल्याने धंद्यामध्ये यश येत नसल्याने सदर नंबरवर व्हिडोओ कॉल केला, त्यावेळी व्हिडीओ कॉलवर एक अनोळखी व्यक्तीने ते करत असलेल्या अघोरी प्रथा व जाट्टोणाच्या प्रकाराची पूजे बाबत तक्रारदाराला माहिती दिली त्यानंतर त्या अनोळखी इसमाने तक्रारदाराला मनोहर मामा यांना अघोरी विद्येचे ज्ञान प्राप्त आहे ते तुमच्या जीवनात सुख शांती पैसा हवा असेल तर मनोहर मामा सांगतील तशी तुम्ही पुजा करा असे सांगुन त्याने तक्रारदाराला विश्वासात घेतले.
त्यावेळी तक्रारदाराने पुजेला किती खर्च येईल असे विचारले असता त्याने 2 लाख रूपये खर्च आहे परंतु अगोदर 50 हजार रूपये ॲडव्हान्स भराव लागेल तो पण लगेच त्यावेळी तुमच काम होईल.आम्ही बऱ्याच लोकांचे जीवन मामांनी सुखी केले आहे.
तुम्हाला अँडव्हॅन्स भरायचा असेल तर दिनांक 23/04/2026 रोजी करमाळा तालुक्यातील निभोरे येथील मठाजवळ येवून पैसे दया असे त्याने फोन केले असता त्यांचे फोन लागत नव्हते त्यानंतर तक्रारदाराने आयुष्यामध्ये आलेल्या अडचणीमुळे त्या इसमावर विश्वास ठेवून दिनांक 23/04/2026 रोजी दुपारी 9156XXXXXX यानंबर फोन केला असता त्याने करमाळा येथील निंभोरे येथे असणारे मनोहर मामाचे मठाकडे जा तिथे आमचा एक माणूस आहे त्याकडे पैसे द्या, पोर्णिमेला तुमची पुजा करू असे त्याने तक्रारदाराला सांगितले म्हणुन तक्रारदार करमाळा तालुक्यातील मनोहर मामाच्या मठाकडे रात्री 07:30 वाजताचे सुमारास पोहचला, त्यावेळी मठाच्या बाजुला एक व्यक्ती उभा होता त्याने पुजा करीता अँडव्हॅन्स देण्यासाठी आला आहात का? असे विचारले.
तक्रारदाराला मनोहर मामांनीच पाठविले आहे. तुम्ही ते पैसे माझ्याकडे दया असे सदर अनोळखी इसमाने सांगुन तक्रारदाराकडून रोख रक्कम 50 हजार रूपये त्याच्याकडे सुपुर्द करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने सदरची रक्कम त्याच्याकडे दिली, त्यानंतर तक्रारदार त्यांना पुजेबाबत विचारले असता तो काहीएक सांगत नव्हता म्हणुन तक्रारदाराने वर दिलेल्या मनोहर मामा भोसले व व्हिडीओ कॉल केलेल्या इसमांना फोन केले असता त्यांचे फोन लागत नव्हते, तसेच सदरचा इसम हा तात्काळ तेथून निघून गेला.
म्हणून तक्रारदाराला खात्री झाली की, मनोहर मामा भोसले व 91560XXXXXX यानंबर चा धारक व अनोळखी इसम यांनी संगणमत करून अप्रमानिकपणे फसवण्यासाठी प्रवृत्त करून तक्रारदाराला विश्वास घेवून अधोरी विद्येतुन पुजा करून सुख शांती व पैसा मिळुन देतो असे म्हणून फसवणुक केली असल्याची खात्री झाल्याने तक्रार देण्यासाठी आलो आहे, अशी माहिती तक्रारदाराने दिली आहे.तक्रारदाराला सांगितले होते.
कोण आहे मनोहर मामा?
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी
डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता
एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले
करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली
अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.