धक्कादायक ! सहाव्या मजल्यावरून उडी घेत इंजिनिअरची आत्महत्या, कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! सहाव्या मजल्यावरून उडी घेत इंजिनिअरची आत्महत्या, कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More



आजकाल आत्महत्येच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. अनेक छोट्या मोठ्या कारणांवरून लोकं टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेत आहेत. आता अशीच एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे . एका इंजिनिअरने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपविले असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  

श्रीकांत सूर्यकांत काटकर असे 33 वर्षीय इंजिनिअरचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद पोलिसांत झाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. मित्रांकडे जाऊन येतो, सांगून घराबाहेर पडलेल्या इंजिनिअरने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. कदमवाडी, पाटोळेवाडी परिसरातील लांबोरे हाउसिंग सोसायटीतील ही  घटना आहे . 

मिळालेल्या माहितीनुसार , वन खात्यातील निवृत्त अधिकारी सूर्यकांत काटकर हे पाटोळेवाडी परिसरातील लांबोरे हौसिंग सोसायटीत मुलगा आणि सूनेसह राहतात. चार वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. तर गेल्याच वर्षी मुलगा श्रीकांत याचा विवाह झाला. श्रीकांत काटकर हे इंजिनिअर असून सरकारी कंत्राटदार होते. त्यांना दोन विवाहित बहिणी असून त्या मुंबईत असतात. उन्हाळी सुट्टीत त्या कोल्हापूरला आल्या होत्या.

शाहपूरी पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीकांत यांनी घरात वडिलांसोबत जेवण केलं. त्यानंतर वडील बहिणींना सोडण्यासाठी स्वत:च्या गाडीने मुंबईला गेले. तर श्रीकांत देखील घरात मित्रांना भेटून येतो म्हणून बाहेर पडले. मात्र, मित्रांकडे न जाता थेट हाउसिंग सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर गेले. तेथून त्यांनी अपार्टमेंटच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत उडी घेतली. 70-75 फुटांवरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने वॉचमनची पत्नी धावत बाहेर आली. तेव्हा आरडाओरडा झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाव्या मजल्यावर एक मोबाईल सापडला. त्याचे लॉक काढले असता श्रीकांत काटकर यांची ओळख पटली.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर श्रीकांत यांच्या वडिलांना माहिती देण्यात आली. तसेच 10 दिवसांपूर्वी गावी गेलेल्या पत्नीलाही सांगण्यात आले. लग्नानंतर वर्षभरातच पतीच्या निधनाची बातमी ऐकल्याने तिला धक्का बसला. या घटनेनं काटकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group