सावधान! सरकारी नोकरीच्या आमिषाने भामट्याने उकळले ४६ लाख; बनावट शिक्के आणि सह्यांचा धक्कादायक कारनामा
सावधान! सरकारी नोकरीच्या आमिषाने भामट्याने उकळले ४६ लाख; बनावट शिक्के आणि सह्यांचा धक्कादायक कारनामा
img
नितीशा कुलकर्णी






राज्यात सध्या सरकारी नोकरीचा नविन स्कॅम सुरू झाला आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कित्येक लोकांना लाखोंचा गंडा घातल्याची प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण आता मुंबईतून समोर येत आहे.  मंत्रालयातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांशी ओळख आहे, असा बनाव करून एका भामट्याने मुंबईतील एका महिलेसह तिच्या नातेवाईकांची तब्बल ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

"मंत्रालयात ओळख आहे? नोकरी पाहिजे? सावधान! मुंबईतील एका महिलेला अशीच विचारणा करून ४६ लाखांना लुटणाऱ्या तोतया अधिकाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. बनावट शिक्के आणि खोट्या सह्यांच्या जोरावर सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून पैशांची लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध डोंबिवलीत गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय?

नाशिक येथील रहिवासी असलेल्या एका आरोपीने आपण मंत्रालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मुंबईच्या भांडुप परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेला विश्वासात घेतले. यानतंर ती महिला आणि तिच्या परिचितांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. यानंतर आरोपीने पीडितांचा विश्वास संपादन करण्यासाठी चक्क बनावट सरकारी कागदपत्रे तयार केली. त्यावर खोट्या सह्या आणि शिक्के मारून ती खरी असल्याचे भासवले. त्या दोघांचा विश्वास बसल्यानंतर आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्याने या महिलेकडून ३५ लाख २५ हजार रुपये घेतले. तर तिच्या ओळखीच्या दुसऱ्या एका व्यक्तीकडून १४ लाख रुपये उकळले.

ही सर्व रक्कम डोंबिवलीतील एका कार्यालयात स्वीकारण्यात आली होती. हा फसवणुकीचा प्रकार जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या काळात सुरू होता. त्याने दिलेली मुदत संपल्यानंतरही कोणालाही नोकरी मिळाली नाही आणि आरोपीने टाळाटाळ सुरू केली, तेव्हा पीडितांना संशय आला. त्यांनी पैशांचा तगादा लावल्यावर आरोपीने केवळ ३.२५ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.

भूलथापांना बळी पडू नका

पीडित महिलेच्या तक्रारीवरून २० एप्रिल रोजी डोंबिवली परिसरात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी आणि विश्वासघात या कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सध्या हे आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारी नोकरी ही केवळ अधिकृत परीक्षा आणि निवड प्रक्रियेद्वारेच मिळते. कोणालाही पैसे देऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू नका आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group