मोठी दुर्घटना... बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा गर्डर कोसळला; एकाचा मृत्यू तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले ;  थरारक VIDEO आला समोर
मोठी दुर्घटना... बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा गर्डर कोसळला; एकाचा मृत्यू तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले ; थरारक VIDEO आला समोर
img
Dipali Ghadwaje
बिहारच्या सुपौल येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास गर्डर कोसळला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

बिहारच्या सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान देशातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाची लांबी जवळपास ११ किलोमीटर इतकी असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २२) पहाटे काम सुरू असताना अचानक पुलाच्या ५०, ५१ आणि ५२ क्रमांकाच्या पिलरचे गर्डर उखडून खाली कोसळले.  यामध्ये जवळपास २० मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत ८ मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. यातील ८ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या इतर मजुरांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी मजुरांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून आक्रोश सुरू केला आहे.
 
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group