पाटणा : बदलापूर शाळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेवरुन राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून बदलापुरातील घटनेच्या निषेधार्ह आणि राज्यातील महिला भगिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन विरोधी पक्ष आक्रमक बनला आहे.
दुसरीकडे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्यासही संमिश्र प्रतिसाद देण्यात आला असून बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली.
दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटीझन्स पोलिसांना ट्रोल करत आहेत.
अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, 21 ऑगस्ट रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान, या भारत बंदमध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं.
पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस व इतर पोलिस फोर्स रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, यावेळी, पोलीस फोर्समधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावरच लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.