पाटणा :- लखीसरायमधील छठ घाटातून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली असून, यामध्ये दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कबिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी मोहल्ला येथे घडलेल्या या थरारक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोळीबारात जखमी झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांना तपासून मृत घोषित केले. दोन्ही भावांच्या पत्नी, वडील आणि बहीण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस अधिक्षक अमरेंद्र कुमार, पोलीस आयुक्त पंकज कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन कुमार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत या थरारक घटनेची माहिती घेतली.
लखीसरायचे पोलीस निरीक्षक पंकज कुमार यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील सहा जण छट पुजेसाठी घाटावर गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या घराजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी हल्लेखोराचा या कुटुंबाशी वाद झाला होता. लखीसरायच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबाराचा प्रकार एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडला असून, यातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आपल्या घरासमोर रहात असलेल्या मुलीवर आशिष चौधरी नावाचा तरुण प्रेम करत होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. शशिभूषण झा, दुर्गा झा, लवली देवी, प्रीती देवी हे चौघे जण या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत.