नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पंचवटी परिसरातील फुलेनगरजवळील राहुलवाडी येथे एका युवकावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून, आरोपींच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या फुलेनगरजवळ राहुलवाडी हा परिसर आहे. या ठिकाणी रात्री एक वाजेच्या सुमारास या परिसरात राहणारा सागर विठ्ठल जाधव हा युवक परिसरात राहणारा सागर विठ्ठल जाधव हा मंगला एका ओट्यावर इतर सहकार्यांसोबत बसलेला होता.
या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून असलेल्या भांडणातून याच परिसरात राहणारे विकी उत्तम वाघ आणि विकी विनोद वाघ या दोघांसह त्यांच्या अन्य साथीदार या ठिकाणी आले. विकी उत्तम वाघ याने विकी विनोद वाघ याच्या सांगण्यावरून सागर विठ्ठल जाधव याच्यावर अचानक दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये सागर जाधव याच्या गालातून गोळी आरपार गेली, तर दुसरी गोळी मानेमध्ये अडकली. घटनेनंतर सागरला त्वरित उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
गोळीबार केल्यानंतर विकी उत्तम वाघ, विकी विनोद वाघ आणि त्यांचे साथीदार हे या ठिकाणावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, सचिन शिरसाठ व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले.
या प्रकरणी योगेश माधव वाघमारे (वय 28) यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत. जखमी असलेला सागर जाधव हा मार्केट यार्डात कामाला असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. विकी उत्तम वाघ व विकास ऊर्फ विकी विनोद वाघ हे दोघे सराईत गुन्हेगार असून, विकी उत्तम वाघ याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत 16 गुन्हे दाखल असून, विकी विनोद वाघवर सहा गुन्हे दाखल आहेत.