चार मुलांची आई फेसबुकवर आली, प्रेमाच्या गप्पा, लग्नाची खोटी आश्वासने झाली आणि पुढे शेवटी नको तेच घडलं
चार मुलांची आई फेसबुकवर आली, प्रेमाच्या गप्पा, लग्नाची खोटी आश्वासने झाली आणि पुढे शेवटी नको तेच घडलं
img
वैष्णवी सांगळे
सोशल मीडियावर मित्र बनवणे त्यांचेसोबत गप्पा मारणे , प्रेमात पडणे या गोष्टी आता सहज घडत आहे. पुढे जाऊन ब्लॅकमेलिंग , पैशांचे फ्रॉड , अत्याचार या गोष्टी देखील वाढल्याचे चित्र आहे. अहिल्यानगर शहरात देखील अशीच भयानक घटना घडली. फेसबुक वरील ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे लग्नाच्या अमिषात बदलले. लग्नाचे खोटे आश्वासन देत एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून, संबंधित तरूण अत्याचारानंतर पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, जालना जिल्ह्यातील राजु भाऊराव काकडे ऊर्फ सुनील पटेल या तरूणाशी पीडित महिलेचा फेसबुकच्या माध्यमातून संपर्क झाला. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत, आणि नंतर प्रेमसंबंधात झाले. 'तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझ्याशीच लग्न करणार', अशा भावनिक पद्धतीने तरूणाने महिलेचा विश्वास संपादन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फेसबुक लाईव्ह करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, खळबळजनक कारण समोर

पीडित महिला विवाहित असून तिला चार मुले आहेत. पती व कुटुंबासोबत राहत असतानाही सोशल मीडियावरील सततच्या संवादामुळे संबंधित तरूणावर तिचा विश्वास बसला. या विश्वासातूनच तिने घरच्यांना काहीही न सांगता त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी रोजी रात्री तरूणाने अहिल्यानगरला आल्याचं सांगून महिलेला भेटण्यास बोलावलं. त्यानंतर दुचाकीवरून तिला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आलं. तेथे एका लॉजमध्ये मुक्काम करत लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

घटनेनंतर सकाळी 'चहा आणतो', असं सांगून तरूण महिलेचा मोबाईल घेऊन बाहेर गेला आणि तो पुन्हा परतलाच नाही. बराच वेळ वाट पाहूनही संपर्क न झाल्यानं महिला घाबरली. अखेर तिने छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, महिलेच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. 

कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेला ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता, प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक व अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार राजू काकडे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या आभासी नात्यांमधील धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group