नेवासा (अहिल्यानगर): समाजातील जड-तड रुढी, अंधश्रद्धा आणि दशक्रिया विधीच्या नावाखाली होणाऱ्या अवाजवी खर्चाला चपराक देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावच्या सरपंचांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे. सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा दशक्रिया विधी आणि पिंडदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ठेवलेल्या पिंडाला कावळ्याने स्पर्श केल्याने, "पिंडाला कावळा शिवणे ही केवळ भूक आहे, मोक्ष नाही," हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
नेमका प्रकार काय?
हिंदू धर्मात मृत्यूनंतर दहाव्या दिवशी पिंडदान करण्याची प्रथा आहे. जोपर्यंत कावळा पिंडाला शिवत नाही, तोपर्यंत मृताचा आत्मा अतृप्त असल्याचे मानले जाते. या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी शरद आरगडे यांनी सौंदाळा येथील स्मशानभूमीत स्वतःचा दशक्रिया विधी आयोजित केला. यावेळी त्यांच्या पत्नी प्रियंका आरगडे आणि मुलगा संग्राम यांनी सत्यशोधक पद्धतीने सर्व विधी पार पाडले.
कावळ्याने शिवला पिंड
विधी सुरू असताना आरगडे यांनी स्मशानभूमीत पिंडदान केले. काही वेळातच कावळ्याने येऊन त्या पिंडाला स्पर्श केला. यावर प्रतिक्रिया देताना आरगडे म्हणाले, "कावळ्याला माणूस मृत आहे की जिवंत हे ठाऊक नसते, त्याला फक्त भूक असते. तो केवळ अन्नासाठी पिंडाला शिवतो. त्यामुळे कावळा शिवण्याला मृताच्या आत्म्याशी जोडणे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे."
विधवा प्रथेलाही लगाम
केवळ विधीच नाही, तर आरगडे यांनी एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र (Affidavit) तयार केले आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, "माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीने कपाळाचे कुंकू पुसू नये, हातातील बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये. तिने सन्मानाने आयुष्य जगावे आणि समाजानेही तिच्यावर कोणतीही विधवा प्रथा लादू नये."
अवाजवी खर्चाला विरोध
दशक्रिया विधी आणि तेराव्याच्या जेवणावळींवर ग्रामीण भागात लाखो रुपये खर्च केले जातात. अनेकदा गरीब कुटुंबांना यासाठी कर्ज काढावे लागते. "माणूस जिवंत असताना त्याला सन्मानाने जगू द्या, मेल्यावर विधींवर खर्च करण्यापेक्षा तो पैसा जिवंत माणसांच्या कल्याणासाठी वापरा," असा संदेश त्यांनी या कृतीतून दिला आहे.
सामाजिक क्रांतीचा वारसा
शरद आरगडे यांनी यापूर्वीही आपल्या ग्रामपंचायतीत गाव 'जातमुक्त' करण्याचा ठराव मंजूर करून खळबळ उडवून दिली होती. आता जिवंतपणी दशक्रिया विधी करून त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना अधिक बळकटी दिली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर आणि विचारवंतांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.