भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर महिलांच्या बाबतीतले गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे नितीन दिनकर यांच्या पदाचा राजीनामा घेऊन त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , जून महिन्यात श्रीरामपूर जवळील ढाब्यामधील दारू पिऊन मित्रांबरोबर डान्स करताना तसेच पदासाठी बोलावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जबरदस्ती डान्स करायला लावत आहेत, असा एक व्हिडिओ सुद्धा काही महिलांनी आमच्याकडे दिला असल्याचे देसाई यांचे म्हणणे आहे.
नितीन दिनकर यांना पोलीस सुरक्षा असल्यामुळे दहशत माजवत आहेत. त्यांनी इतरांवर अनेक खोटे गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत, अशी तक्रार महिलांनी भूमाता ब्रिगेडकडे दिली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळची ही व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या विरोधात जाहीरपणे कोणी बोलत नाही, बोलल्यास ते एखाद्या गुन्ह्यात अडकवतात असा आरोप देखील देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नितीन दिनकर यांच्या पदाचा राजीनामा घेऊन त्यांची भाजपातून हकालपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत भाजपचे उत्तरनगरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांनी आपली बाजू मांडली आहे. तृप्ती देसाईंनी पोस्ट केलेला व्हिडीओ फॅमिली प्रोग्रामचा असून तो व्हिडिओ माझ्या इन्स्टा आणि फेसबुक अकाऊंटला पोस्ट केलेला आहे. माझ्या भाचीच्या वाढदिवसाचा तो व्हिडीओ असून घरगुती कार्यक्रमात एक मिनिटाचा डान्स केला तर काय चुकले? 14 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ टाकणे म्हणजे मला बदनाम करण्याचे षडयंत्र असून मी तृप्ती देसाईंविरोधात फिर्याद दाखल करून मानहाणीचा दावा दाखल करणार असल्याचे नितीन दिनकर यांनी म्हटलंय.