मित्रानेच केला घात , क्षुल्लक कारण अन ताम्हणी घाटात हत्येचा रक्तरंजित थरार
मित्रानेच केला घात , क्षुल्लक कारण अन ताम्हणी घाटात हत्येचा रक्तरंजित थरार
img
वैष्णवी सांगळे
पुण्याहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या एका २२ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी पैशांच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात हा खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करत त्यांची हत्या करून मृतदेह ताम्हिणी घाटातील आडमार्गाला फेकून देण्यात आला. माणगाव पोलिसांनी अवघ्या ८ तासांत या हत्याकांडाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य गणेश भगत (वय २२, रा. भोसरी, पुणे) हा आपल्या अनिकेत वाघमारे, तुषार पोटोळे आणि प्रज्वल हंबीर या तीन मित्रांसह इनोव्हा क्रिस्टा कारने (MH12 XM 9448) महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान, त्यांच्यामध्ये पैशांच्या व्यवहारावरून खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी धावत्या कारमध्येच दोरीने आदित्यचा गळा आवळला.

त्यानंतर सणसवाडी गावच्या हद्दीतील 'सिक्रेट पॉईंट' जवळ आरोपींनी गाडी थांबवली. तेथे आदित्यला ओढत नेत कोयत्याने त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर सपासप वार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह तिथेच टाकून आरोपी पसार झाले.ताम्हिणी घाटातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना परिसरातील जमीन दाखवण्यासाठी जंगलाच्या भागातील एका आडमार्गावरती गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने माहिती देण्यात आली, त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली, त्यावेळी तरूणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या. सुरुवातीला मृतकाची ओळख पटत नसल्याने हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, रायगड पोलिसांनी तातडीने पुणे शहर आणि ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली.

माणगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या 6 ते 8 तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेमुळे ताम्हणी घाट आणि पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मित्रच मित्राच्या जिवावर उठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group